कराड (सातारा)- सौर ऊर्जेचा वापर (सोलर वॉटर हिटर व सौर दिवे) करणार्या मिळकतधारकांना संकलित करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय मलकापूर ही राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे.
मलकापूर नगरपालिकेने सौर ऊर्जेचा वापर करणार्या मिळकतधारकांना संकलित करात 10 टक्के सूट दिलेली आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन धोरणानुसार चार्जिंग स्टेशन उभारणार्या स्थानिक नागरी संस्थांतील नागरिक, गृहनिर्माण संस्थांना देखील मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे. स्वत:च्या इलेक्ट्रीक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात 2 टक्के, गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायिक चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात 5 टक्के आणि गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्वावर चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या जागेसाठी व्यापारी दराऐवजी घरगुती दराने आकारणी करण्याचाही निर्णय मलकापूर नगरपालिकेने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.