कराड (सातारा) -उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या जाणार्या लसीच्या डोसची माहिती दररोज प्रसिध्द करावी. ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना तो प्राधान्याने द्यावा. तसेच 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाईन प्रक्रियेची सक्ती करू नये, अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या. लसीकरणाच्या नियोजनाबाबत कराडच्या शासकीय विश्रामगृहावर चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली.
ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली जाऊ नये -
कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या डोससाठी प्रशासनाने नियमावली तयार करावी, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य द्यावे, 18 ते 44 वयोगटासाठी जी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे, त्या प्रक्रियेमुळे लसीकरणात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. लसीकरणासाठी कोणत्याही सेंटरला नंबर येत आहे, बाहेरील जिल्ह्यातील लोकांचासुद्धा नंबर सातारा जिल्ह्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, अश्या परिस्थितीत वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली जाऊ नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लस मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी गावनिहाय काटेकोरपणे लसीकरण केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी दिल्या.