सातारा - मागील आठवडाभर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर येथे विविध कार्यक्रम सुरू होते. तर, आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. सोमवारी ललीत कीर्तनाने या महोत्सवाची समाप्ती होणार आहे.
आज महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे २ वाजता भाविक भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो शिवभक्तांनी दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री १२ वाजता चांदीच्या ११ धारेच्या अभिषेक पात्राद्वारे शिवलिंगावर महाभिषेक करण्यात आला. शिवशंकर पिंडीची महापूजा करण्यात आली. बेलफुल, दवणा शमीपत्र, आंब्याचा मोहर शिवशंकर पिंडीस अर्पण करण्यात आला. ढोलताशा, शंख, शिंग, तुतारी, छत्र, चामर, अब्दागिरी यांच्यासह प्रदक्षिणा करण्यात आली. या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून आलेल्या भाविकांची गर्दी होती.