सातारा -साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लाँटमध्ये इथेनॉलवर चालणार्या दुचाकीचे उत्पादन केल्यास, पुन्हा ही कंपनी पुर्ण क्षमतेने सुरु होईल. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे याबाबत बजाज उद्योग समुहाने सकारात्मक विचार करून सातार्यातील प्लॅंट पुन्हा सुरु करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बजाज उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांना निवेदन दिले आहे.
रोजगार निर्मितीची निकड पाहता कंपनी तातडीने सुरु व्हावी -
सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे. सुमारे ४५ एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळाला होता. मात्र, या कंपनीचे कामकाज बंद अवस्थेत आहे. सातार्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. बजाज उद्योग समुहामार्फत इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी निर्मिती करण्यात येत असल्याचे समजले आहे. ही बाब आनंददायी आणि स्वागतार्ह असून इथेनॉलवर चालणार्या दुचाकीचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लँटमध्ये सुरु करावे, असेही शिवेंद्रसिंहराजे निवेदनात म्हटले आहे.