सातारा :अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोमवारी तातडीने कराड दौऱ्यावर येत आहेत. प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत. शरद पवार यांनी आपण जनतेत जाऊन आगामी निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रितीसंगमावर जाऊन अजित पवार यांच्या बंडाबाबतची आपली भूमिका माध्यमांसमोर आपण स्पष्ट करणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांच्या कराड दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे
शरद पवार उद्या प्रीतिसंगमावर :अजित पवारांनी आज राजकीय भूकंप करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. या घडामोडींनंतर शरद पवार सोमवारी कराडमध्ये येऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधून राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत.
कराड उत्तरचे आमदार एकनिष्ठ :यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी, माजी आमदार पी. डी. पाटील यांचे सुपूत्र आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. गेली पाच टर्म ते सलग आमदार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण करताना त्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. शरद पवारांच्या भूमिकेशी आपण एकनिष्ठ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.