सातारा - गेले दोन वर्षे अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेला महाबळेश्वर-पाचगणीचा नाताळचा पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधिच पर्यटकांनी महाबळेश्वरकडे ( Mahabaleshwar ) पाठ फिरवली आहे. त्यातही आता नव्या ओमायक्रॉनच्या ( Omicron ) घोंगावणाऱ्या संकटामुळे टाळेबंदी होईल या भितीने महाबळेश्वरची हॉटेल, रिसॉर्टमधील बुकींग रद्द होऊ लागली आहेत.
नाताळचा सिझन
दिवाळी सुट्यांचा हंगाम संपला की पर्यटकांना नाताळचे वेध लागतात. महाबळेश्वरमध्ये तर पर्यटकांच्या दृष्टीने दिवाळी इतकेच नाताळचे आकर्षण असते. नाताळ साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक इयर एन्डची पार्टी साजरी करुनच नव्या वर्षाचे स्वागत करतात. पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी महाबळेश्वरच्या बाजार पेठेसह प्रमुख रस्ते, हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट सजलेले असतात.
टाळेबंदी किंवा निर्बंधाची भिती
गेले दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय अडचणीत होता. त्यातून कुठे उभारी घेत नाही तोच आता ओमायक्रॉनचा शिरकाव देशात झाल्याने अनामिक भितीचे सावट महाबळेश्वरच्या बाजार पेठेत पहायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या एमपीजी क्लबचे जनरल मॅनेजर अमीत नेगी म्हणाले, ‘‘पर्यटकांमध्ये ओमायक्रॉनची अनामिक भीती मनात आहे. यामुळे पुन्हा टाळेबंदी किंवा प्रशासनाची बंधने येतील, अशी शंका पर्यटकांच्या मनात पहायला मिळते. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा महाबळेश्वरचा नाताळचा हंगाम असतो. या सात दिवसांसाठीचे बुकींग साधारण 14-15 डिसेंबरपर्यंत महाबळेश्वरमध्ये फुल्ल होते. लॉजिंगला या काळात सर्वाधिक दर मिळतो. अधिक पैसे मोजूनही लोकांना लॉज उपलब्ध होत नाहीत, अशी सर्वसाधारण परिस्थिती असते.