सातारा -जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांची ओळख तशी दुष्काळी तालुके म्हणूनच आहे. या भागातील पर्जन्यमान सरासरी २०० ते ३५० मिमी एवढे आहे. ऐन पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यातील अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. पाणी टंचाईमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची भीषण स्थिती या तालुक्यांमध्ये असते. मात्र, यंदा याच्या उलट परिस्थिती या भागात पहायला मिळत आहे. येथे १२०० मिमी ते १४५० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे सर्व तलाव, ओढे, नदी, बंधाऱ्यांमध्ये पाणी पातळी वाढली असून ते पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.
साताऱ्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान हेही वाचा -साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी असून यातील पिके कुजली आहेत. शेतांमध्ये साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. तर दावणीतील जनावरे चाऱ्यासाठी हंबरडा फोडत असल्याने गुडघाभर पाण्यात जीव धोक्यात घालून केवळ जनावरांच्यासाठी हे शेतकरी चारा काढताना दिसत आहेत. दहिवडी शहरापासून सुमारे 7 ते 8 किमी अंतरावरील वाघमोडेवाडी येथील शेतकरी सुनंदा वाघमोडे यांच्या शेतात अद्यापपर्यंत कोणीही पंचनामा करायला आले नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अशा दुर्लक्षित शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी अन कर्मचारी पंचनामा करायला पोहचणार का? यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा -पक्षी दिन विशेष : मायणी पक्षी अभयारण्य तांत्रिकतेच्या गर्तेत; मानवी हस्तक्षेपामुळे पक्षांचे आश्रयस्थान धोक्यात
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे असताना सुध्दा अजून काही ठिकाणी ग्रामसेवक आणि कृषी सहायक पोहचले नसल्याचे चित्र आहे.