सातारा : मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे 24 तासात 307 मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, महाबळेश्वर-पाचगणी आणि कुंभरोशी मार्गाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.
चिपळूण-कराड वाहतूक ठप्प :कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत. लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांसाठी रासायनिक पदार्थांची वाहतूक करणारी अवजड वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. तसेच कराडहून कोकणात भाजीपाला घेऊन जाणार्या वाहनांना देखील पावसाचा, दरड कोसळल्याचा फटका बसला आहे. सध्या प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
आंबेनळी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली :पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे मंगळवारी रात्री दरड कोसळून रस्त्यावर आली होती. ही दरड हटविण्याचे काम सकाळी हाती घेण्यात आले. परंतु, सकाळी दलिब टोक या ठिकाणीही दरड कोसळल्याने महाबळेश्वर-पोलादूर मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे.