कराड (सातारा) - कराडजवळच्या नांदलापूर गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5 जाने.) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला. पंधरा मिनिटे महामार्गाच्या कडेला बिबट्या बसल्याने वाहने थांबली. तसेच बघ्यांची गर्दी वाढल्यानंतर बिबट्याने नजीकच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. वन विभागाने बुधवारी (दि. 6 जाने.) सकाळपासून या बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत महामार्गावर बिबट्या जखमी झाला असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. जखमी बिबट्या महामार्गाच्या पश्चिमेला सुमारे पंधरा मिनिटे बसून होता. वाहने थांबल्यानंतर बघ्यांची गर्दी होऊ लागताच महामार्ग ओलांडून बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, वनरक्षक रमेश जाधवर घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षककही पिंजरा घेऊन आले. उसाचे पीक मोठे असल्याने आणि अंधारामुळे बिबट्याचा शोध घेणे धोक्याचे होते. त्यामुळे आज (बुधवारी) सकाळपासून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.