सातारा -शहर हद्दीवर दाट झाडी आहे. काही निसर्ग निरीक्षक कॅमेरा लावून जंगलाचे निरीक्षण करत होते. त्यावेळी त्यांना एका बिबट्याची हालचाल दिसली. कॅमेरा झुम करुन पाहिले असता दुसराही बिबट्या आढळला. दोघांच्यात खेळ चालला होता. बऱ्याच उशिरानंतर दोघेही दाट झाडीत पसार झाले. या बिबट्यांचे चलचित्रण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून स्थळ व इतर तपशिलाविषयी या ठिकाणी गोपनियता राखण्यात येत आहे.
सातारा शहर व परिसर निसर्गसमृद्ध आहे. या शहराला वाघ, बिबट्या या मांजरकुळातील वन्यजिवांचे दिर्घ काळापासून सानिध्य लाभले आहे. साताऱ्यात, शनिवार पेठेतील 'वाघाची नळी' या ठिकाणी ब्रिटिशपुर्व काळात वाघ पाणी प्यायला यायचा, असे जुने-जाणते लोक सांगतात. मंगळवार पेठेत, चिपळूणकर बागेच्या पाठीमागे एक विहिर आहे. त्याही ठिकाणी पुर्वी वाघ पाणी प्यायला येत होता, अशी नोंद आढळते.