महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..अन् पाळीव कुत्र्याच्या शिकारीसाठी घरात घुसलेल्या बिबट्याचा प्रयत्न फसला - बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी घरात घुसलेल्या बिबट्याला कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आणि घर मालकाच्या पत्नीने खिडकी उघडल्यामुळे धूम ठोकावी लागली.

leopard attack on dog
कुत्र्याच्या शिकारासाठी घरात घुसलेल्या बिबट्याचा प्रयत्न फसला

By

Published : Dec 23, 2020, 1:04 PM IST

Updated : Dec 23, 2020, 5:09 PM IST

कराड (सातारा)- पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी घरात घुसलेल्या बिबट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. कराड तालुक्यातील काले गावात शेतकरी संतोष पाटील यांच्या शेतात मंगळवारी रात्री साठेआठच्या सुमारास ही घटना घडली. कुत्र्याची शिकार करण्याच्या हेतूने पाटील यांच्या घरात बिबट्या घुसला होता. त्यावेळी कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आणि पाटील यांच्या पत्नीने घराची खिडकी उघडून आवाज केल्यामुळे बिबट्याला शिकार न करताच धूम ठोकावी लागली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

काले (ता. कराड) येथील प्रगतशील शेतकरी संतोष पाटील यांचे गावापासून काही अंतरावर नाईकबा माळ नावाच्या शिवारात घर आहे. मंगळवारी रात्री ते कराडला दवाखान्यात गेले होते. त्यांची पत्नी आणि मुली घरात होत्या. रात्री साडे आठच्या सुमारास बिबट्या त्यांच्या घराच्या पायऱ्यावर चढून कुत्र्याची शिकार करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी बिबट्याला पाहून त्यांचा पाळीव कुत्रा जोरात भुंकायला लागला. बिबट्या कुत्र्यावर झडप घालण्याच्या तयारीत असतानाच संतोष पाटील यांच्या पत्नीने कुत्र्याचा आवाज ऐकून घराची खिडकी उघडली आणि आरडाओरड केली. त्यामुळे शिकारीच्या बेतात असलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि पाळीव कुत्र्याचा जीव वाचला.

कुत्र्याच्या शिकारासाठी घरात घुसलेल्या बिबट्याचा प्रयत्न फसला

या घटनेमुळे संतोष पाटील यांची पत्नी घाबरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ पती संतोष पाटील यांना मोबाईलवर संपर्क साधून याची माहिती दिली. माहिती मिळताच पाटील यांनी घराकडे धाव घेतली. घरी आल्यावर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर त्यांचा या घटनेवर विश्वास बसला. तसेच ही माहिती आजुबाजूच्या लोकांना समजल्यानंतर तेही घटनास्थळी आले. नाईकबा माळ हे शिवार डोंगरालगत असल्याने सातत्याने बिबट्याचा या परिसरात वावर पाहायला मिळत आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

..म्हणून लावले सीसीटीव्ही कॅमेरे

संतोष पाटील हे शेतातील घरात राहायला गेल्यानंतर त्यांचे दोन पाळीव कुत्रे गायब झाले. म्हणून संतोष पाटील यांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यानंतर तिसरा कुत्राही गायब झाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मंगळवारी चौथ्या कुत्र्याचीही बिबट्याची शिकार होणार इतक्यात संतोष पाटील यांच्या पत्नीने खिडकी उघडल्याने बिबट्याला धूम ठोकावी लागली.

Last Updated : Dec 23, 2020, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details