कराड (सातारा) - घारेवाडी (ता. कराड) येथील धुळेश्वर डोंगरात शनिवारी सायंकाळी दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. न्युमोनिया आणि आतड्याच्या विकारामुळे तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी शवविच्छेदन करून बिबट्याचे दहन करण्यात आले.
न्यूमोनियामुळे दोन वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू, शवविच्छेदनानंतर केले दहन - satra forest department
घारेवाडी (ता. कराड) येथील धुळेश्वर डोंगरात शनिवारी सायंकाळी दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. न्युमोनिया आणि आतड्याच्या विकारामुळे तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
![न्यूमोनियामुळे दोन वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू, शवविच्छेदनानंतर केले दहन file photo](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12:52-leopard-1406newsroom-1592118658-724.jpg)
शनिवारी एक मेंढपाळ धुळेश्वराच्या डोंगरात मेंढ्या चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी परत येत असताना त्याला बिबट्या दिसला. त्याने सरपंचांना घटनेची माहिती दिली. सरपंचाने वनविभागाला कळविताच सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय हिंगमिरे आणि वनरक्षक, वनपाल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या नख्या, मिशा, दात सुस्थितीत होते. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता बिबट्याचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले असावेत, असा निष्कर्ष निघाला. बिबट्यास निमोनिया आणि आतड्याचा विकार होता, असेही स्पष्ट झाले. रविवारी सकाळी बिबट्याचे शवविच्छेदन करून वन कार्यालयाच्या परिसरात दहन करण्यात आले.