महाराष्ट्र

maharashtra

Leopard Attack : वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी

By

Published : Mar 17, 2022, 3:04 PM IST

वैरण आणण्यासाठी गेलेल्या रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack on Farmers) चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. कराड तालुक्यातील मस्करवाडी गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे.

Leopard Attack on farmer
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

कराड (सातारा) - वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack on Farmers) चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे. आज (गुरूवारी) सकाळी कराड तालुक्यातील मस्करवाडी गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय 55, रा. मस्करवाडी, ता. कराड), असे जखमी शेतकर्‍याचे नाव असून त्यांना कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिल्लेसोबत असल्याने बिबट्या चवताळला -

रामचंद्र सूर्यवंशी हे सकाळी 9 च्या सुमारास माऊली कडा नावाच्या शिवारात वैरण आणण्यासाठी गेले होते. तेथील कडब्याच्या गंजीच्या आडोशाला मादी बिबट्या आणि दोन पिल्ले होती. त्यामुळे शेतकर्‍याला पाहून बिबट्या चवताळला आणि शेतकर्‍यावर हल्ला केला. सूर्यवंशी यांच्या हातावर, मानेवर, तोंडावर आणि पोटावर पंजा मारून बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केले. त्यांनी बिबट्याचा प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.

वनविभागाच्या अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव -

शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच वनरक्षक ए. एम.जाधव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. तसेच जखमी रामचंद्र सूर्यवंशी यांना उपचारासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. मस्करवाडीचे सरपंच जोतीराम सूर्यवंशी, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन जखमी शेतकर्‍याकडून घटनेची माहिती घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details