सातारा : सातार्यातील खोजेवाडी गावातील पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी 'होऊ दे खर्च' म्हणत चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे. नृत्यातील अश्लिल हावभावामुळे दोन महिन्यांपूर्वी गौतमी विरोधात सातारा न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर तिचा साताऱ्यात झालेला हा दुसरा कार्यक्रम आहे.
गौतमीच्या नृत्यावर चाहते फिदा :सातार्याजवळच्या खोजेवाडीसारख्या छोट्या गावात लावणी स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्याचे समजताच तरूणांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला गर्दी केली होती. खोजेवाडीतील मल्हार शिंदे या पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडीलांनी हा कार्यक्रम ठेवला होता. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ केले. गौतमीच्या कार्यक्रमामुळे मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसाची संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा आहे.
गौतमी एका शो चे 'इतके' घेते मानधन :सध्या लावणी म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येते ते गौतमी पाटीलचे. गौतमीच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी करतात. काही महिन्यांपूर्वी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून यशाच्या शिखरावर असलेली गौतमी तिच्या एका शो साठी आता दीड ते दोन लाख रूपये घेते.
साताऱ्यात गौतमी विरोधात याचिका :सातारा शहरानजीकच्या शेंद्रे-सोनगाव येथे 21 डिसेंबर 2022 रोजी गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात अश्लिल चाळे केल्याचा आरोप करत सातार्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी गौतमीच्या विरोधात कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचा अर्ज सातारा न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.