कराड (सातारा) -महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज (शुक्रवार) १०८वी जयंती. जयंतीनिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची आदरांजली
यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करत महाराष्ट्र आज पुढे जात असल्याचे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची आदरांजली
सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, नंदकुमार बटाणे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.
पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र
स्वर्गीय चव्हाण साहेबांनी कराड परिसरातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करताना पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याच विचाराने त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. देशाच्या संरक्षणमंत्रीपदावरही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करत महाराष्ट्र आज पुढे जात असल्याचे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.