सातारा - पाटण तालुक्यातील काठी-अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी येथे भुस्खलन होऊन रस्ता खचला आहे. तसेच जितकरवाडी नजीकच्या डोंगरात भुस्खलनाचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २२ कुटुंबांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे रस्ता खचला -खुडपुलेवाडी येथे भुस्खलन होऊन रस्ता खचल्यामुळे प्रांताधिकारी सुनिल गाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गाडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन काळजी घेण्याच्या सूचना केल्या. गावातील ४ ते ५ कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलांची कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
जितकरवाडीतील २२ कुटुंबांचे स्थलांतर -वांग मराठवाडी धरणाच्या बॅक वॉटरजवळ असलेल्या जितकरवाडी २२ कुटुंबे राहत आहेत . GSI च्या सर्व्हे नुसार या कुटुंबांचे कायमचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. गावाच्या वरच्या बाजूला डोंगरावर एक भेग असल्याने त्याठिकाणी पावसामुळे भुस्खलन होण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे जिंती येथील शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांना प्रशासनामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
११ मंडलांमध्ये 65 मिलीमीटपेक्षा जास्त पाऊस- सातारा जिल्ह्यातील ११ मंडलांमध्ये गेल्या चोवीस तासात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामध्ये कोयनानगर परिसरातील हेळवाक मंडलात सर्वाधिक १३१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परळी ७४.८, बामणोली ७६, पाटण १०१.३, म्हावशी ६८.५, हेळवाक १३१.८, मरळी ६५.८, मोरगिरी ९६.८, मल्हारपेठ ६५.८, महाबळेश्वर १०७.३, तापोळा ६५.५ आणि लामज ११८.३ या मंडलांनीही ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची सरासरी ओलांडली आहे.