महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योग उभारणीसाठी कृष्णा बँक तरुणांना अर्थिक प्रोत्साहन देणार- डॉ. अतुल भोसले - satara corona update

स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या तरूणांना उद्योग उभारणीसाठी कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देऊ, अशी ग्वाही कृष्णा बँकेचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी दिली. 

डॉ. अतुल भोसले
डॉ. अतुल भोसले

By

Published : May 24, 2020, 2:51 PM IST

कराड (सातारा) - तरुणांसाठी येणारा काळ कसोटीचा राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी लघुउद्योग उभारून स्वयंरोजगार निर्माण करण्याची गरज आहे. स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या तरुणांना उद्योग उभारणीसाठी कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देऊ, अशी ग्वाही कृष्णा बँकेचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

‘कोरोना, लॉकडाऊन आणि त्यानंतरची परिस्थिती’, या विषयावर डॉ. भोसले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना कराड तालुक्यातील तरुणांना स्वयंरोजगार उभे करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच लॉकडाऊन जाहीर केल्याने अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यात मोठे यश आले. जगानेही याची दखल घेतली. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्षपदही भारताच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना बहाल केले. लॉकडाऊन काळातील अडचणी सोडविण्यासाठी असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने विशेष लक्ष देत 20 लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे, असे डॉ. भोसले म्हणाले.

सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांनी दूरदृष्टीतून उभे केलेले आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे कृष्णा हॉस्पिटल हे कोरोनामुक्तीची शिखर संस्था बनत आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 93 पैकी 54 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यामध्ये यश आले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणीची सोय देखील उपलब्ध असून लस चाचणीसाठी निवडल्या गेलेल्या देशातील 40 निवडक संस्थांमध्ये कृष्णा हॉस्पिटलचा समावेश झाला आहे. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये सुमारे 55 लाख रुपयांचा निधी प्रदान केला जाणार आहे, असेही डॉ. अतुल भोसलेंनी सांगितले.

कोरोनासारख्या साथीच्या काळात जोखीम पत्करून लोकांच्या सेवेसाठी झटलेले डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा, शेतकरी, विविध ग्रामपंचायती व नगरपालिकांचे कर्मचारी अशा सर्वांच्याच कार्याचे समाजाने स्मरण ठेवले पाहिजे. प्रशासकीय अधिकार्‍यांचे कामसुध्दा प्रशंसनीय आहे, असे डॉ. भोसले म्हणाले. योग्य उपचाराने कोरोनामुक्त होता येत असल्याने कोणीही घाबरून जाऊ नये. योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. सर्वांनी मास्क व हॅन्ड सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे. काही लक्षणे आढळल्यास तातडीने कृष्णा हॉस्पिटल किंवा अन्य कोविड केअर केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details