कराड (सातारा)- पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष लागलेल्या रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर विद्यमान सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सहकार पॅनेलने 11 हजाराच्या उच्चांकी मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. तर विरोधातील संस्थापक आणि रयत पॅनेलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. तिरंगी लढतीत झालेल्या 91 टक्के इतक्या उच्चांकी मतदानामुळे सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे लागले होते. सभासदांनी कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय सहकार पॅनेलला मिळवून दिला आहे. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलच्या प्रचारासाठी तळ ठोकला होता. परंतु रयत पॅनेल तिसर्या क्रमांकावर राहिले. कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 29 जून) मतदान झाले होते. 47 हजार 160 मतदारांपैकी 34 हजार 135 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण मतदानापैकी सुमारे 10 हजार सभासद मयत आहेत. उर्वरीत 37 हजार मतदारांपैकी 34 हजार मतदारांनी मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी 91 टक्क्यांवर गेली. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे निकालाबाबतची उत्सुकता वाढली होती. क्रॉस व्होटींगचीही चर्चा होती. परंतु या सर्व चर्चांना निकालानंतर पुर्णविराम लागला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलने साडे दहा हजाराच्या मताधिक्क्याने 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवत विरोधकांचे पराभव केले आहे.
1989 मध्ये झाले होते पहिले सत्तांतर
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांच्या उठावानंतर सर्वात प्रथम 1989 ला सत्तांतर झाले होते. त्यानंतरचा अपवाद वगळता दर पाच वर्षांनी सातत्याने सत्तांतर होत होते. यशवंतराव मोहिते-जयवंतराव भोसले या बंधूंच्या संघर्षातून कृष्णा कारखान्याच्या सत्ताकारणात संघर्षाची ठिणगी पडली होती. दिवंगत यशवंतराव मोहिते यांनी 1980 ते 1985 दरम्यान कराड लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. तत्पूर्वी, ते सलग 30 वर्षे आमदार, मंत्री होते. 1985 साली त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला. रेठरे बुद्रुक या मूळ गावी त्यांनी आपला मुक्काम हलवला.
दिवंगत जयवंतराव भोसले होते 30 वर्षे चेअरमन
कारखान्याच्या स्थापनेपासून म्हणजेच 1955 पासून जयवंतराव भोसले हे कृष्णा कारखान्याचे चेअरमन होते. 1985 नंतर यशवंतराव मोहिते राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कृष्णा कारखान्याच्या कारभारात लक्ष घातले. कारखान्याच्या कारभारात भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत 1987 पासून रयत संघर्ष मंचच्या माध्यमातून कारखान्याच्या कारभाराविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यावेळी दोन्ही भावांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. कृष्णा कारखान्याच्या लढ्यासाठी यशवंतराव मोहितेंनी रयत संघर्ष मंचाची स्थापना करून जयवंतराव भोसले यांच्याविरोधात लढा उभारला.
आतापर्यंत सहावेळा सत्तांतर