कराड (सातारा) -रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्ही. एस. आय.) 2019-20 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. तर, कारखान्याचे सभासद शेतकरी अशोक जाधव यांना प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार दिले जातात. सन 2019-20 या गळीत हंगामात कृष्णा कारखान्याने शंभर टक्क्याहून अधिक गाळप क्षमतेचा वापर करत 12.61 टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेत 5.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी 86.96 टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 95.77 टक्के राहिले आहे. साखर तयार करण्यासाठी फक्त 15.39 टक्के इतकाच बगॅसचा वापर कारखान्याने केला आहे. याची दखल घेत व्ही. एस. आय. ने सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्यास जाहीर केला आहे.