कराड - कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसर्या लाटेतही 1100 हून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. यामुळे कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत 4 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीच्या लढ्यात सुरूवातीपासूनच मोठे योगदान दिले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आतापर्यंत 4 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
'कोरोनाची दुसरी लाट गंभीर'
'कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट गंभीर स्वरूपाची आहे. या दुसर्या लाटेत जलद गतीने संक्रमण होताना दिसत आहे. तसेच तरूणांमध्ये कोरोना संक्रमण अधिक आढळून आले आहेत', असे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
'दुसऱ्या लाटेत 1100 कोरोनामुक्त'
'दुसर्या लाटेमध्ये सुरवातीच्या काळात रुग्णांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. दुसर्या लाटेत आतापर्यंत सुमारे 1500 कोरोना रुग्ण दाखल झाले. त्यापैकी 1100 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले', असे डॉ. भोसले म्हणाले.
'म्यूकरमायकोसिसचे 3 रुग्ण बरे'
'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने 400 बेडचा स्वतंत्र कोरोना वॉर्ड सुरू केला आहे. येथे ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. ऑक्सिजन, औषधे आणि इंजेक्शनचा तुडवडा भासला. तरीही रूग्णांवर उपचार करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. आता म्यूकरमायकोसिस या नव्या आजारानेही डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव झालेले 5 रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 3 जण बरे झाले आहेत. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत', असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.
हेही वाचा -माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी निवड