कराड (सातारा) -कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीसाठीची २ अद्ययावत उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रोज 200 कोरोना चाचण्या करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कोरोना चाचणीच्या गुणवत्तेतही वाढ होणार असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यात आघाडीवर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीच्या मोहिमेत सातत्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलने कोरोना लस संशोधनात सहभाग घेत कोरोना चाचणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेने कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने आत्तापर्यंत 2 हजार 606 इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत दिवसाला 40 ते 60 इतक्याच कोरोना चाचण्या होत होत्या. परंतु, दोन अत्याधुनिक उपकरणांमुळे चाचण्यांमध्ये चार पटीने वाढ होणार आहे.