सातारा- शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या केरळ येथील शांतिगिरी संस्थेसह आठ व्यक्तिमत्त्वांना लेक लाडकी अभियानातर्फे 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने हा कार्यक्रम झाला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा -सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली
रोबोटीक प्रयोगशाळा चालवणारी केरळची 'शांतीगिरी' ही उच्च माध्यमिक शाळा, पूरस्थितीत मदतकार्य करणारे मुक्ता पुजारी व बाबा नदाफ (हेरवाड, कोल्हापूर), महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या उमा साळुंखे, दुर्लक्षित घटकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या मिना शिंदे, आदर्श शिक्षिका शैलजा पाठक, लाँड्री व्यावसायिक भारती मोहिते (सर्व सातारा), एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या साहित्यिक दिशा पिंकी शेख (संगमनेर) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेणाऱ्या आणि त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या सावित्रीच्या लेकींचा अभिमान वाटतो. सावित्रीबाई यांच्या स्मृती केवळ जयंतीलाच नव्हे तर वर्षभर, आयुष्यभर जपाव्यात, असे उद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रसंगी बोलताना काढले.