सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी ( Koyna Dam water increased ) वाढला आहे. त्यामुळे, गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. तसेच, धरणात येणार्या पाण्याची आवक ( Koyna Dam water news ) प्रतिसेकंद 33 हजार 359 क्युसेकवर पोहचली आहे. धरणातील पाणीसाठा 20.71 टीएमसी झाला आहे.
हेही वाचा -Satara Rain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात पावणे दोन टीएमसीने वाढ
नवजा येथे मुसळधार पाऊस -कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 103 मिलीमीटर, नवजा येथे 162 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात तब्बल 2.88 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
पूर्वेकडे पावसाची रिमझिम -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असताना पुर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याच्या पुर्वेकडील भागात अजून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर नसल्यामुळे नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा बरीच खाली आहे. त्यामुळे, नदीकाठी सध्या तरी धोकादायक परिस्थिती नाही. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
एनडीआरएफकडून आज नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी -संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कराड आणि पाटण तालुक्यासाठी एनडीआरएफची एक टीम पाठविण्यात आली आहे. ही टीम बुधवारी (दि. 6) कराडमध्ये दाखल झाली आहे. बुधवारी दिवसभर प्रशासकीय अधिकार्यांसमवेत त्यांच्या बैठका सुरू होत्या. कोणत्या प्रकारची आपत्ती उद्भवू शकते, याची एनडीआरएफच्या जवानांनी माहिती घेतली. तसेच, आज सकाळी ही टीम नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी करणार आहे.
हेही वाचा -Heavy Rainfall In Koyna Catchment Area: जोरदार पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ