सातारा - पावसाळ्याच्या तोंडावर पाटण तालुक्यातील धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे नियोजन करून काळजी घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी कोयना आणि सातारा सिंचन मंडळाच्या अधिकार्यांना केल्या आहेत. पाटण तहसील कार्यालयात धरणातील पाण्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते.
पाटण तालुक्यातील कोयना, तारळी, वांग-मराठवाडी, मोरणा-गुरेघर तसेच उत्तरमांड या प्रमुख धरणांमध्ये आज असलेला पाणीसाठा जून अखेर किती राहणार? पावसाळ्यामध्ये धरणात येणार्या पाण्याचे कसे नियोजन अधिकार्यांनी केले आहे, याचाही आढावा देसाईंनी घेतला. तसेच सातारा सिचंन मंडळाचे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकार्यांकडूनही आढावा घेतला.
पाटण तालुक्यातील पाचही प्रमुख धरणांमध्ये असलेल्या मर्यादित पाणीसाठ्याचे नियोजन करावे. वांग-मराठवाडी धरणात पावसाळ्यात पाणीसाठा झाल्यानंतर उमरकांचन गावात पाणी शिरते. त्यावर काय उपाययोजना केली आहे, असा सवालही देसाईंनी केला. धरणात सध्या मर्यादित पाणीसाठा आहे. त्याचे योग्य नियोजन करण्याची काळजी घ्या, अशी सूचना देसाईंनी अधिकार्यांना केली.
पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, डीवायएसपी अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, शशिकांत गायकवाड, जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात उपस्थित होते.