सातारा-कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त जनतेचे आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवस अखेर सुरूच होते. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन या आंदोलनास धरणग्रस्तांनी पाठिंबा दिला आहे. सातारा, सांगली, रत्नागिरी, पालघर, ठाणे व ज्या-ज्याठिकाणी धरणग्रस्त आहेत, त्या-त्याठिकाणी लोकांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे.
कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनस्थळी ठिकठिकाणी जावून प्रशासनाच्यावतीने कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भविकट्टी यांनी भेटी घेतल्या आहेत. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सचिन कदम, महेश शेलार व आंदोलनकर्ते उपस्थित होते.
धरणग्रस्तांच्या या आंदोलनाची दिवसेंदिवस तीव्रता वाढतच आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे याआंदोलनाचे लोन पूर्ण महाराष्ट्रभर जाईल. हे आंदोलन सातारा जिल्ह्यातील प्रशासनासह सरकारला जड जाणार, अशी प्रतिक्रिया कोयना प्रकल्पग्रस्तांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सांगोला तालुक्यातील लोकांनी, पुणे येथील रहिवासी असलेल्यांनी आंदोलन करून कोयना धरणग्रस्त जनतेला जाहीर पाठिंबा दिला.
शासनाने आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा वणवा पेटू शकतो. यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन सुरूच राहून त्याची तीव्रता वाढत जाईल, असा इशारा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त लोकांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सातारा पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.