सातारा:समर्थ रामदास यांनी समाजाला बलोपासनेचे महत्व पटवून देण्यासाठी सातारा, कराड, कोल्हापूर परिसरात मारूती मंदिरांची स्थापना केली. त्यांना समर्थ स्थापित अकरा मारूती म्हणून ओळखले जाते. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने समर्थ स्थापित मारूतींचा इतिहास आणि धार्मिक महत्व जाणून घेऊया.
1. चाफळचा वीर मारूती: पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रजवरून साधारण 11 कि.मी. अंतरावर असलेल्या चाफळ गावात इ.स. 1648 मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची समर्थांनी प्रतिष्ठापना केली होती. चाफळचा वीर मारूती म्हणून या मारूतीची ओळख आहे.
2. वीर मारूती: चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे आणखीन एक मंदिर आहे. या मंदिरात भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच रौद्र मुद्रेतील मारूतीची मुर्ती आहे. मारूतीच्या पायाखाली दैत्य आहे. दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ याठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
3.माजगावचा मारूती: चाफळपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजगावात गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपातील दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोड्याच्या आकाराचा दगड होता. गावकर्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इ.स. 1650 मध्ये याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा करून घेतली.
4.शिंगणवाडीचा मारूती: चाफळपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगणवाडीच्या मारूतीला खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती, असेही संबोधले जाते. याठिकाणी समर्थांची ध्यान करण्याची जागा रामघळ आहे. याच ठिकाणी इ.स. 1650 मध्ये समर्थांनी मारुतीच्या मुर्तीची स्थापना केली. तर ही चार फूट उंचीची उत्तराभिमुखी हनुमानाची मूर्ती आहे.
5.उंब्रजचा मारूती:-कराड तालुक्यातील उंब्रज याठिकाणी समर्थ रामदासांना काही जमीन इनाम मिळाली होती. सन इ. स. 1650 मध्ये समर्थांनी एक मारुती मंदिर बांधले. तसेच एका मठाची स्थापना केली. या मंदिरातील मारुतीची मूर्ती दोन फूट उंच आहे. येथे 14 दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन केले होते.
6.मसूरचा मारूती: उंब्रजपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर याठिकाणी समर्थांनी 5 फूट उंचीचे मारूती मुर्तीची स्थापना केली. चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुखी असलेली ही मारुती मूर्ती 11 मारुतींमध्ये सर्वात देखणी मूर्ती आहे. सन इ.स. 1646 साली या मंदिराची स्थापना समर्थांनी केली. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेल्या अवतारातील या मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसर्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे. मंदिराचा सभामंडप 13 फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत आहे.
7.शहापूरचा मारूती: कराड-मसूर रस्त्यावर मसूरपासून 3 किलोमीटर अंतरावर शहापूर फाटा आहे. तेथून एक कि.मी. अंतरावर मारूती मंदिर आहे. अकरा मारुतींमध्ये सर्वांत पहिला स्थापन केला. इ.स. 1645 साली स्थापना झाली. या मारुतीला चुन्याचा मारुती असेही म्हटले जाते. तर नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. सात फूट उंच मूर्ती उग्र दिसते.
8.शिराळ्याचा मारूती: नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा बसस्थानकाजवळ असलेल्या मंदिरात मारूतीची भव्य अशी मूर्ती आहे. सन इ.स. 1655 साली स्थापना केली. सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली मूर्ती उत्तराभिमुखी आहे. सूर्योदयवेळी व सूर्यास्ताला मूर्तीच्यावर प्रकाश पडतो.
9.बहे-बोरगावचा मारूती: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहे गाव आहे. कराड-कोल्हापूर मार्गावरील पेठवरून साधारण 12 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. समर्थांनी नदीच्या डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना केल्याचे सांगण्यात येते. इ.स. 1652 मध्ये त्याठिकाणी राम मंदिर होते. मंदिरासमोर शिवलिंग आहे.
10.मनपाडळेचा मारूती: मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-जोतिबाच्या परिसरात आहेत. किणी वडगाव-वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर 14 किलोमीटर आहे. 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या मनपाडळे येथील मारुतीची स्थापना समर्थांनी इ.स.1652 मध्ये झाली. ही पाच फूट उंचीची साधी मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहे.
11.पारगावचा मारूती: येथील मारुतीला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती म्हणतात. कराड-कोल्हापूर रस्त्यावर किणी वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या नवे पारगावमध्ये इ.स. 1653 साली स्थापना केलेला हा मारुती आहे. 11 मारुतींपैकी सर्वांत शेवटी स्थापन केलेला आहे.
हेही वाचा:Hanuman Jayanti 2023 महाबली हनुमान आहेत महादेवाचा रुद्रावतार जाणून घ्या बजरंगबलींच्या बारा नावांची माहिती