कराड (सातारा) -काश्मिरच्या किश्तवाड जिल्ह्यातील जोधापूरची तरुणी सुमन भगत ही सैन्य दलात प्रशिक्षण अधिकारी असलेल्या कराडच्या अजित पाटील यांच्याशी नुकतीच विवाहबध्द होऊन कराडची सुनबाई झाली. लव्ह विथ अॅरेंज पध्दतीने हा विवाहसोहळा पार पडला. सह्याद्रिने हिमालयाशी सोयरीक केली, अशी चर्चा या विवाहादरम्यान झाल्याची पाहायला मिळाली.
कराडमधील श्रीमती रंजना प्रल्हाद पाटील यांचा मुलगा अजित हा चार वर्षांपुर्वी सैन्य दलात भरती झाला आहे. तो प्रशिक्षण अधिकारी (ट्रेनिंग ऑफिसर) असून, सध्या त्याची पोस्टिंग लडाख येथे आहे. काश्मिरी तरुणीशी त्याने लग्नगाठ बांधल्याने या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित आणि सुमन यांच्या प्रेमाची गोष्ट चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी आहे.
दोघांची झाशीमध्ये ओळख झाली
मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवरील झाशी येथे अजितची पोस्टिंग होती. सुमनची थोरली बहिण शीतल ही देखील त्यावेळी झाशीमध्येच होती. सुमन सुटीसाठी बहिणीकडे आली होती. शीतलचे पती अनिलकुमार हे देखील सैन्य दलातच आहेत. त्यांची आणि अजितची चांगली मैत्री आहे, यातूनच पुढे सुमन आणि अजितची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
प्रेम फुलले जोधापूरमध्ये
झाशी येथून अजित यांची पोस्टिंग लडाखला झाली. त्यानंतर काहीकाळ तो किश्तवाड जिल्ह्यातील जोधापूरमध्ये सुमनच्या कुटुंबातच वास्तव्यास होता. त्यामुळे झाशीत झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. त्यांचे प्रेम फुलत गेले.