सातारा - थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कास पठार किंवा नजिकच्या परिसरात जाण्याचा बेत आखत असाल, तर सावधान! कारण दारू पार्ट्या, चुलीवरचा स्वयंपाक हे बेत तुम्हाला महागात पडू शकतात.
या निसर्ग कंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे खास फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक बामणोली ते सह्याद्री नगर परिसर व कास पठार परिसर क्षेत्रावर नजर ठेवणार आहे.
कास पठार हे पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून त्याला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा आहे. काही नागरिक याठिकाणी चूल पेटवणे, पार्ट्या करून कचरा फेकणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे यांसारखे प्रकार करून पर्यावरणाला उपद्रव करतात. अशा लोकांचा बंदोबस्त करून वन कायद्यानुसार कडक फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल शितल राठोड यांनी दिली आहे.