कराड (सातारा) -देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या दिवंगत खाशाबा जाधव यांच्या भूमीत तब्बल 61 वर्षांनी होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ( Maharashtra Kesari Wrestling Competition ) निमित्ताने सातारा जिल्ह्यातील कुस्तीच्या दैदीप्यमान परंपरेला उजाळा मिळाला आहे. खाशाब जाधव यांचे कर्तृत्व जगाला माहित आहे. पण, त्यांच्याप्रमाणेच कराडमधील काही मल्लांनी ( Karadkar wrestlers ) देखील आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकवला होता. आज ते हयात नाहीत. परंतु, एकेकाळी राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना भुरळ घालणार्या कराडमधील अशाच काही पैलवानांच्या कारकिर्दीचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.
मारूती वडार यांच्या समवेत शत्रुघ्न सिन्हा मारूती वडार ( Wrestler Maruti Vadar ) : कुस्तीचा लौकीक सातासमुद्रापार नेणारा मल्ल -मारूती वडार यांच्यासारखा पाथरवट (वडार) समाजातील रांगडा माणूस कुस्तीच्या तालमीत रमला आणि वादळी मल्ल म्हणून गाजला. 6 मार्च 1965 रोजी कोल्हापूरच्या खासबाग मैदानात मारुती वडार विरुद्ध पाकिस्तानचा भीमकाय मल्ल बाला रफिक यांच्यातील लढतीत मारूती वडार यांनी घिस्सा डावावर बाला रफिकला चितपट करून ते मैदान गाजवले होते. पैलवान दारासिंग, पैलवान रंधवा यांच्याबरोबरच्या त्यांच्या कुस्त्याही गाजल्या होत्या. त्यांचा लौकीक ऐकून इंग्लंडच्या स्पोर्ट असोसिएशनने त्यांना इंग्लंडला बोलावून घेतले. तेथे दोन वर्षे त्यांनी फ्री स्टाईल प्रकारच्या प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. मारुती वडार यांच्या दंड थोपटण्याच्या आणि फेटा बांधण्याच्या शैलीबद्दल परदेशातील कुस्ती शौकिनांना मोठे आकर्षण होते. जागतिक मल्लांच्या वारसा यादीत त्यांच्या नावाची नोंद आहे. इंग्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड, पाकिस्तानसह सहा देशांमध्ये त्यांनी कुस्त्या केल्या. परदेशात सलग 36 कुस्त्या जिंकून आल्यानंतर कराडच्या या सुपूत्राचा यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्या हस्ते 1968 ला दिल्लीत सत्कार घडवून आणला होता.
कुस्ती मैदानातील लढतीचा क्षण सुनील गावसकर होते मारूती वडारांचे चाहते -सुनील गावसकर यांना लहानपणापासून कुस्तीबद्दल आकर्षण होते. त्यांना कुस्तीपटू व्हायचे होते. त्यामुळे ते कुस्तीपटू मारुती वडार यांचे मोठे चाहते होते. तसेच वडार यांचे सामान गावसकर स्वत: घ्यायचे, असा किस्सा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या काउंट बार्टेली या महान मल्लाला मारुती वडार यांनी कॉमनवेल्थ हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये 15 व्या फेरीपर्यंत बरोबरीत रोखले होते. मारूती वडार हे आपला मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे बार्टेली यांनी मान्य केले होते. मारूती वडार यांच्या परदेशातील तत्कालिन कुस्त्यांच्या जाहीराती आज देखील पाहायला मिळतात.
दावणगिरी येथे मारूती वडार यांची हत्तीवरून काढण्यात आलेली मिरवणूक दावणगिरी, मुंबई, पुण्यात निघाल्या होत्या हत्तीवरून मिरवणुका -मारूती वडार यांच्याशी कुस्ती खेळण्यासाठी सातारा परिसरात तोडीचा मल्ल नव्हता. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर गाठले. मोतीबाग तालमीत ते कुस्तीचे धडे गिरवू लागले. कोल्हापूर, दावणगिरी (कर्नाटक), पंजाब, दिल्ली, अजमेर (राजस्थान) येथील मैदाने त्यांनी गाजवली. पाकिस्तानी मल्ल भिल्ला पंजाबी, पै. चंदगीराम, पै. मेहेरदीन यांच्यासारख्या मल्लांना त्यांनी आस्मान दाखवले. लहान-मोठ्या सुमारे अडीचशे कुस्त्या त्यांनी केल्या. दावणगिरी येथील मैदानात भुडन चार्लीला चितपट केल्यानंतर तसेच मुंबई, पुण्यातील कुस्ती मैदान जिंकल्यानंतर कुस्ती शौकिनांनी हत्तीवरून मिरवणुका काढल्या होत्या. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार त्यांना ओळखत. मुंबईतील वल्लभभाई मैदानातील कुस्तीवेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभिनेते धमेंद्र, शत्रुघ्न सिन्हा हे देखील मारूती वडार यांच्या कुस्ती कौशल्याने आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे प्रभावित झाले होते.
बाबुराव वास्के यांचा सत्कार करताना लोकनेते बाळासाहेब देसाई बाबुराव वास्के : दोनशेहून अधिक कुस्त्या जिंकून चांदीच्या गदाही पटकाविल्या -कराडच्या आझाद हिंद आखाड्याचे मल्ल दिवंगत बाबुराव वास्के यांनी 500 रूपये इनामाच्या दोनशेहून अधिक कुस्त्या जिंकल्या. तसेच चांदीच्या दोन गदाही पटकावल्या. सही करण्यापुरते शिक्षण झालेल्या बाबुरावांनी आझाद हिंद आखाड्याचे नाव महाराष्ट्रात दुमदुमत ठेवले. रोज पहाटे 10 मैल धावण्याचा व्यायाम ते करत. प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू न दिल्यामुळे कुस्तीमध्ये त्यांना चपळता दाखवता आली. कोल्हापूर, सांगलीसह फलटण संस्थानच्या आश्रयातील कित्येक पैलवानांना आणि पंजाबच्या प्रसिध्द पैलवानाला देखील बाबुराव वस्तादांनी आस्मान दाखवले होते. ते हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे देखील वस्ताद होते. आंदळकर हे सुरूवातीला आझाद हिंद आखाड्यात कुस्तीचा सराव करत होते.
अपराजित राहिलेला पैलवान -मुंबईच्या गिरगावात जीना हॉलमध्ये कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते बाबुराव वास्के यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला होता. बाबुरावांच्या तोलामोलाचा पैलवान आज हयात नाही. त्याने हार खाल्ल्याचे ऐकिवात नाही. बाबुराव हा अजिंक्य पैलावन आहे. त्याचा सत्कार शिवाजी मंदिरात व्हायला पाहिजे. बाबुराव हा नाभिक समाजातला असला तरी त्याचा सत्कार नाभिक समाजातर्फेच का? कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी सांगतो की, पुण्यात कुस्तीगीर परिषदेच्यावतीने त्याचा सत्कार होईल, असे उद्गारही लोकनेत्यांनी त्यावेळी काढले होते.
राघू पैलवान : दारासिंगच्या भावाला आस्मान दाखवणारा मल्ल -राघू यादव तथा राघू पैलवान हे मूळचे पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे. नंतर ते कराडमध्ये स्थायिक झाले. ते देखील आझाद हिंद आखाड्यातच कुस्तीचा सराव करायचे. मुंबईतील तुका वस्ताद (तुकाराम भालेकर) यांना ते फार मानायचे. प्रसिध्द मल्लांची त्यांच्याकडे नेहमी ये-जा असायची. राघू पैलवान त्यांच्याकडे मुंबईला गेले होते. प्रसिध्द अभिनेते आणि पैलवान दारासिंग यांचे बंधू रंधवा हे देखील कुस्तीमध्ये पारंगत होते. दारासिंगच्या दबदब्यामुळे रंधवाशी कोणी कुस्ती करत नसे. तेव्हा राघू पैलवान यांनी रंधवाचे आव्हान स्वीकारत दीड तास फ्री स्टाईल कुस्ती करून रंधवाला आस्मान दाखवले होते. स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगतांना सहाय्य आणि आश्रय दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला होता.
गुलाब बागवान : रमजान उपवासाच्या सोळाव्या दिवशी केली कुस्ती -ऐतिहासिक मनोरे परिसरातील आझाद हिंद आखाड्याचे वस्ताद गुलाब बागवान यांची कहानी देखील रंजक आहे. रमजाानच्या काळातील उपवास सुरू होते. उपवासाचा सोळावा दिवस होता. त्यावेळी कराडच्या मंगळवार पेठेत सणाच्या निमित्ताने कुस्तीचे मैदान ठेवण्यात आले होते. मुख्य लढतीच्या पैलवानाला आखाड्यातून फिरविण्यात आले. त्याच्याबरोरबर कुस्ती लढण्याची विचारणा झाली. त्यावेळी गुलाब बागवान मैदानात उतरले. प्रेक्षकांनी फेटे उडवत त्यांची हुर्ये उडवली. रमजानचा उपवास असतानाही बागवान मैदानात उतरले. मैदानात पडलेल्या फेट्यांकडे निर्देश करून म्हणाले, हे फेटे घरी गेल्यावर आपल्या बायकांना नेसवा. कारण कुस्ती मीच जिंकणार आहे. बोलल्याप्रमाणे गुलाब बागवानांनी पाच मिनिटात कुस्ती निकाली करून हुर्ये उडविणार्यांना कृतीतून उत्तर दिले होते. तत्कालिन ब्रिटीश कलेक्टर हे त्यांना 'प्यारा गुलाब' म्हणायचे. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्याने बिटिश सैन्य सतत त्यांच्या मागावर असायचे. गुलाबला पकडा, पण त्रास देऊ नका, असे तो ब्रिटीश कलेक्टर पोलिसांना सांगायचा. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर गुलाब बागवान यांनी मंडईतील आखाड्याला नाव दिले आझाद हिंद आखाडा!
हेही वाचा -Wrestling Competition : पैलवान संजय पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास १ लाखाचे बक्षिस