सातारा (कराड) - कराड नगरपालिकेने आरोग्य विभागातील निरक्षरांना साक्षर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे दर शनिवारी चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचार्यांच्या हाती झाडू ऐवजी पाटी-पेन्सिल दिसत आहे. याच सफाई कर्मचाऱ्यांच्या जोरावर कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दोन वेळा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
झाडू नव्हे, शनिवारी सफाई कर्मचार्यांच्या हाती दिसणार फक्त पाटी-पेन्सिल पगार पत्रकावर सह्या करण्यासह बँकेतील कामातही अडचणी
दैनंदिन स्वच्छतेची कामे करणार्या आणि चतुर्थश्रेणीत मोडणार्या आरोग्य विभागातील महिला व पुरूष कर्मचार्यांपैकी काही जण अशिक्षित आहेत. तर काही जण कमी शिकलेले आहेत. अशा कर्मचार्यांना पगार पत्रकावर सह्या करण्यासह बँकेतील कामातही अडचणी येतात. अशा निरक्षर कर्मचार्यांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्याची संकल्पना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना सुचली. तसेच ही संकल्पना त्यांनी तातडीने अंमलातही आणली.
सारक्षरता वर्गाल ३५ महिलांची उपस्थिती
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रा. माणिक बनकर यांनी साक्षरता वर्गात शिकवावे, असे सुचवण्यात आल्यानंतर प्रा. बनकर यांनीही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. प्रा. बनकर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पीएच.डी. मिळविली असून सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. या साक्षरता वर्गाचा शुभारंभ शनिवारी नगरपालिकेत झाला. सुमारे ३५ महिला साक्षरता वर्गाला उपस्थित होत्या. यातील काही महिलांनी तर शाळेचे तोंड पाहिलेले नाही. तर काही महिलांचे शिक्षण चौथी, पाचवी, आठवीपर्यंत झालेले आहे. पुर्वी शाळेत शिकलेल्याचा आता विसर पडल्याचे सांगत पुन्हा शिकण्यासाठी आपण या साक्षरता वर्गात उपस्थित राहणार असल्याचे त्या महिलांनी सांगितले.
मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेची तोंडओळख
निरक्षर असल्याने घरात आणि कामाच्या ठिकाणी हेटाळणी होत असते. त्यामुळे या वर्गाच्या माध्यमातून निरक्षर सफाई कर्मचार्यांना साक्षर बनवण्यावर भर देण्याचा मुख्य हेतू असल्याचे बनकर यांनी सांगितले. तसेच या वर्गाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेचीही तोंडओळख करून देण्यात येणार आहे. नगरपालिकेत दर शनिवारी हा वर्ग भरणार आहे. दरम्यान, साक्षरता वर्गात शिकायला आलेल्या कर्मचार्यांना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते पाटी-पेन्सिल देण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील उपस्थित होते.