सातारा -कराड तालुक्यातील मुंढे गावचे सुपुत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हे जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी हुतात्मा झाले. सप्टेंबर 2011 मध्ये ते बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.
संदीप हे 16 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मिरमधील नौसेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सायंकाळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले. ही बातमी मुंढे ग्रामस्थांना बुधवारी सकाळी 10 वाजता समजली. गावचा सुपूत्र शहीद झाल्याने मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. संदीप यांचे मोठे भाऊ शशिकांत यांच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबतही माहिती कळू दिलेली नाही.
नुकतेच झाले होते मुलीचे बारसे..
संदीप यांचा जन्म मुंढे येथे 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्याची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसापूर्वी ते गावी आले होते. त्यानंतर ते पुन्हा सीमेवर लढण्यासाठी गेले होते. यावेळी मात्र, त्यांच्याऐवजी, त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमीच गावी आली.