कराड (सातारा) - दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल (मंगळवार ता.15) पासून बँकेच्या 29 शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्यास सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया आणि ऑडीट पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सहकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा होतील. या प्रक्रियेला सुरूवात झाल्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कराड जनता सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांना 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण आहे. रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेचा परवाना रद्द केला. तथापि, विमा सरंक्षणामुळे 99 टक्के ठेवीदारांचे 5 लाखापर्यंतचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत. मागील आठवड्यात ठेव विमा व पत हमी कार्पोरेशनच्या अधिकार्यांची पुणे येथे बैठक झाली. त्या बैठकीत ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी घेण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयानुसार कार्यवाहीला कालपासून (मंगळवार) सुरूवात झाली आहे.