कराड(सातारा)- कराडचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णाबाईची श्रावणातील शेवटच्या सोमवारी (आज) होणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. श्री कृष्णाबाई ट्रस्टचे अध्यक्ष आनंद पालकर यांनी याबाबतची माहिती दिली. कृष्णाबाई यात्रेला दीडशे वर्षांची परंपरा आहे. परंतु, कोरोना संकटामुळे ही परंपरा यंदा खंडित झाली आहे.
कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाईची श्रावणी यात्रा कोरोनामुळे रद्द; दीडशे वर्षांची परंपरा खंडित - श्री कृष्णाबाई यात्रा रद्द
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यासोबतच कराडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कराडचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णाबाईची श्रावणातील शेवटच्या सोमवारी (आज) होणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. श्री कृष्णाबाई ट्रस्टचे अध्यक्ष आनंद पालकर यांनी याबाबतची माहिती दिली.
श्री कृष्णाबाई हे कराडचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्रीकृष्णाबाईची यात्रा असते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी कराड तालुक्यातील ग्रामदैवतांच्या पालख्या वाजत-गाजत कराडला येत. प्रीतिसंगमावर देवस्नान झाल्यानंतर श्री कृष्णाबाईची भेट घेऊन ग्रामदैवतांच्या पालख्या परत जात. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे प्रशासनाने गावोगावच्या यात्रा-जत्रांवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे यात्रा-जत्रा रद्द कराव्या लागल्या आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाईची यात्राही रद्द करण्यात आली आहे. यात्रेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन श्री कृष्णाबाईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भव्य स्वरुपात साजरी होणारी आणि दीडशे वर्षांची परंपरा असणारी कृष्णाबाईची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करावी लागत आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री कृष्णाबाई ट्रस्टचे अध्यक्ष आनंद पालकर यांनी केले आहे.