कराड (सातारा) - सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तडकाफडकी बदली करण्यात आल्याने कराड आणि दहिवडीच्या डीवायएसपींनी मॅटमध्ये (प्रशासकीय न्यायाधीकरण) धाव घेतली. उद्या (सोमवारी) त्यांच्या बदली संदर्भातील अपिलावर मॅटमध्ये सुनावणी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड आणि दहिवडी अशा दोन उपविभागाचे डीवायएसपी सुरज गुरव आणि भाऊसाहेब महामुनी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांची बदली झाली. त्यामुळे गुरव आणि महामुनी या दोन्ही अधिकार्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे बदलीविरोधात दाद मागितली आहे.
सूरज गुरव यांची अचानक बदली करण्यात आल्याने कराडकरांनी गुरव यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसील कचेरीवर दोन दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. कोल्हापुरात कार्यरत असताना दोन वर्षापुर्वी गुरव यांचा महापौर निवडीवेळी हसन मुश्रीफांशी जोरदार वाद झाला होता. तसेच सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावचे रहिवासी असून तीन महिन्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कराडसह सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचाही बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरव यांच्या बदलीसाठी राजकीय वर्तुळातून सुत्रे हलविण्यात आल्याचीही चर्चा आहे.
कराडकरांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये गुरव यांची बदली राजकीय हस्तक्षेपातून झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुश्रीफांशी झालेला वाद आणि आगामी कृष्णा कारखाना निवडणूक, या दोन्हीचा गुरव यांच्या बदलीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. सुरज गुरव यांच्या बरोबरच दहिवडीचे डीवायएसपी भाऊसाहेब महामुनी यांनीही मॅटचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे मॅटच्या निकालाकडे सातारा जिल्हा पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.