सातारा - कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे पर्यटकांना कास पठार खुले करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी नाही. कास पठार खुले होण्याची शक्यता धूसर आहे. पर्यटकांसाठीच्या लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम कासच्या तसेच एकूणच पर्यावरणावर होईल, असे निरीक्षण कोल्हापूरचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डाॅ. मधुकर बाचूळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नोंदवले.
कोविडमुळे कास राहणार पर्यटकांना बंद ? नानाविध फुलांचा बहर जाणार टिपेला - कोरोना कास पठार पर्यटन बंद
हे पठार पर्यटनासाठी खुले करावे की नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, असे वनविभागाने म्हटले आहे. कास खुले करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. यंदा कासला पर्यटकांचा प्रवेशबंदच राहण्याची शक्यता प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
![कोविडमुळे कास राहणार पर्यटकांना बंद ? नानाविध फुलांचा बहर जाणार टिपेला मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल स्थिती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8823641-2-8823641-1600258919300.jpg)
जागतिक निसर्ग वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावरील रानफुलांच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या उघडीपीनंतर पडलेल्या उन्हामुळे कास पठारावर जगातील अलौकिक रानफुले डोकवायला सुरवात होते. कासकडे जाताना वाटेत यवतेश्वरपासून पुढे, रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या रंगाची छोटी सोनकीची फुलं आपले स्वागत करतात. पठारावर पोचल्यानंतर तेरड्याच्या फुलांचा जागोजागी जणू सडाच पडलाय, असा भास पाहणाराला होतो. निळ्या- पांढऱ्या रंगाची सीतेची आसवं, पांढऱ्या रंगाची गेंद, तुतारी, चवर (रानहळद), गवती दवबिंदू, नीलिमा, अबोली, सोनकी, महाकाली, आभाळी, नभाळी आदी ३० ते ३५ प्रकारची फुले पाहायला मिळत आहेत. दुर्गा उत्सवानंतर कासचा बहर टिपेला जाईल, असे तेथील स्थानिकांनी सांगितले.