सातारा:आज राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. यापैकी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. तर जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. जावळी-महाबळेश्वर बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी आमदारांच्या पॅनेलने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवून एकहाती सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी भाजप आमदारांना साथ केल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले होते.
सहा जागा बिनविरोध, बारा जागा जिंकल्या: सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्व १२ जागांवर विजय मिळवला. तत्पूर्वी ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.