सातारा - 'कोरेगावच्या जरंडेश्वर शुगर मिल्सला बँकेने मंजूर केलेल्या 237.60 कोटी पैकी 129.98 कोटी रुपये कर्ज वाटप केले असून 31 कोटी 60 लाख रुपयांची परतफेड झाली आहे. आजपर्यंत 97 कोटी 38 लाख रुपये नियमित येणेबाकी आहे. हे कर्ज कारखान्यास आधुनिकीकरण, विस्तारवाढ, को-जन, डिस्टीलरी व साखर मालतारण या कारणांसाठी बँकेने प्रचलित कायदे व बँकेच्या धोरणास अनुसरुन 2016-17 पासून मंजूर केले. ही मंजुरीसहभाग योजनेअंतर्गत लिड बँक (शिखर बँक) म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिली आहे, अशी स्पष्टीकरण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिले आहे.
कोरेगावच्या जरंडेश्वर शुगर मिल्सला केलेला कर्जपुरवठा नियमानुसारच असल्याचे स्पष्टीकरण सायंकाळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी प्रसारमाध्यमांना दिले. बँकेला ईडीने (सक्त वसुली संचालनालय) नोटीस काढल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने हा खुलासा केला आहे.