कराड ( सातारा ) - भारतीय नौदलात अत्याधुनिक आयएनएस वागशीर पाणबुडी ( INS Vagsheer Submarine ) दाखल झाली असून, नुकतेच तिचे जलावतरण देखील झाले. यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि हिंद महासागरात भारताचा दबदबाही वाढला आहे. 40 टक्के देशी तंत्रज्ञानावर ही पाणबुडी तयात करण्यात आली आहे. या पाणबुडीत बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणेची निर्मिती ही कराडसारख्या ग्रामीण भागातील श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिजमध्ये झाली ( Shree Air Conditioning System ) आहे. यामुळे कराडच्या औद्योगिक उत्पादनावर जागतिक दर्जाची मोहोर उमटली आहे.
औद्योगिकरणात कराडमधील उद्योजकाची भरारी -आयएनएस वागशीर ही पाणबुडी नौदलाच्या पाणबुडी प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. ही पाणबुडी 40 टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अत्याधुनिक नेव्हीगेश यंत्रणा बसवण्यात आली आहे. वागशीर ही 50 दिवस पाण्याखाली राहू शकते. या पाणबुडीतील वातानुकूलित यंत्रणेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कराडच्या श्री रेफ्रिजरेशनची निविदा मंजूर झाली. यापूर्वी पाणबुडीला फ्रेंच कंपनीची वातानुकूलित यंत्रणा वापरली जात होती. प्रथमच कराडसारख्या ग्रामीण भागातील उद्योजकाच्या कंपनीत तयार झालेल्या वातानुकूलित यंत्रणेचा नौदलाच्या पाणबुडीत वापर करण्यात आला आहे. यामुळे श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिजचे सीएमडी आर. जी. शेंडे, कार्यकारी संचालिका राजश्री शेंडे आणि कुशल अधिकारी, कर्मचार्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.