सातारा - 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या पंक्ती ब्रीदवाक्य म्हणून घेऊन सुरू झालेलं भिलार हे भारतातील पहिलं 'पुस्तकांचं गाव'! लाॅकडाऊच्या काळ्याकुट्ट आठवणी पुसत हे गाव पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी पाचगणी-महाबळेश्वरमध्ये येत असलेल्या पर्यटकांची पावलं आता पुन्हा भिलारकडे वळू लागली आहेत.
महाबळेश्वर जवळील भिलार म्हणजे भिरभिरणारा वारा आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणारे गाव. हे गाव 'पुस्तकांचं गाव' म्हणून २०१७ मध्ये जगाच्या नकाशावर आले. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला आणि पुस्तकाच्या गावाची पर्यटकांअभावी जणू रयाच गेली. गेले आठ महिने पाचगणी-महाबळेश्वरसह संपूर्ण राज्यात पर्यटनाला प्रतिबंध होता. त्यामुळे भिलार गाव पर्यटक, वाचकांअभावी हिरमुसला होता. त्यातच गावात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे गावात बाहेरील लोकांना काहीकाळ प्रवेश बंदी होती.
भिलार पुन्हा खुले!
आता 'पुन्हा खुलं' अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आणि हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा महाबळेश्वर-पाचगणीकडे पडू लागली आहेत. गेल्या आठवडाभरात पर्यटकांचा ओघ गिरीस्थानाकडे पुन्हा सुरू झाल्याने पुस्तकांचे गाव हळूहळू कात टाकू लागले आहे. ग्रामस्थांनी ग्रंथसंपदेवरील धूळ झटकून उपलब्ध साहित्य पर्यटकांसाठी खुले केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या गिरीस्थानावर मौजमजेत घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे छोटे-छोटे ग्रुप भिलारला आवर्जून भेट देऊ लागले आहेत. विशेषतः शनिवार- रविवार पर्यटकांचे जथ्थे पुस्तकांच्या गावाला पायधूळ झाडू लागले आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांत बहरेल पर्यटन -
भिलारचे सुपुत्र, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब भिलारे म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक महाबळेश्वरला फिरायला येतात. तेव्हा त्यांची पावले भिलारला लागतात. कोरोनाकाळात अडचणीचा प्रश्न निर्माण झाला होता आणि पर्यटकांचा ओघ थांबला होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पर्यटक पुन्हा डेस्टीनेशन महाबळेश्वरकडे वळू लागले. येता-जाता पर्यटक पुस्तकांच्या गावाला भेट देतात. हा ओघ दिवाळीनंतर आणखी वाढेल, अशी आशा बाळासाहेब भिलारे यांनी व्यक्त केली.