सातारा - शहरात गुरुवारी रात्री वाट चुकलेला एक रानगवा शिरला होता. त्याच्यासोबत एक पिल्लूही होते. सुमारे ४ तासांच्या धुडगूसानंतर माहुली, कोयना सोसायटी, स्वरुप काॅलनी, रानमळा अशा प्रवास करत हा गवा सोबतच्या पिल्लासह म्हसवे गावच्या दिशेने निघून गेला. यावेळी वन विभागाकडून या रान गव्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांना अपयश आले आहे. तब्बल 4 तास गवा पुढे अन् वनविभाग मागे असा पाठशिवणीचा खेळ यावेळी पाहायला मिळाला.
रानगव्याचा पिल्लासह सातारा शहरात मुक्तसंचार; वन कर्मचाऱ्यांबरोबर रंगला पाठशिवणीचा खेळ - indian bison rescue
सातारा शहरात एक गवा त्याच्या पिल्लासह आढळून आला होता. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी भेट देऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गवा कोंडव्याच्या दिशेने गेल्यावर त्याचे बचावकार्य थांबविण्यात आले.
गर्दी हटवताना तारांबळ-
सातारा शहरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास संगम माहुली परिसरातील लोकांना अचानक एका पिल्लासह रानगव्याचे दर्शन झाले. रानगवा शहरात शिरल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. गोंधळलेला रानगवा शहरातील रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. तसेच प्रत्येकजण त्या गव्याचे व्हिडिओ चित्रिकरण करून सोशल मीडियाव ही माहिती अपलोड करू लागले त्यानंतर या गव्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तत्काळ कोयना नगर सोसायटीमध्ये धाव घेतली. त्यावेळी नागरिकांची गर्दी पाहून पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी प्रथमता गर्दी पांगवण्याचे काम हाती घेतले. मात्र ही गर्दी हटवता हटवता वनविभाग व पोलिसांची तारांबळ उडाली.
सैदापूरमार्गे कोंडवेच्या दिशेने डोंगरात
नागरिकांची गर्दी आणि शहरातील वाहनांचा धोका पाहता वनविभाने त्या गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, गर्दीमुळे भेदरलेला गवा त्याच्या पिल्लासह सैरावैरा पुढे मार्ग काढत धावू लागला. गवा पुढे आणि वन कर्मचारी मागे असा खेळ मध्यरात्री ३ वाजेपर्यंत सुरू होता. अखेर तो गवा सैदापूरमार्गे पिल्लासह कोंडवेच्या दिशेने गेल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, उपवन संरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, साता-याचे वनक्षेत्रपाल डाॅ.निवृत्ती चव्हाण या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या.