सातारा - पोलीस असल्याचे सांगून सोन्याची चैन आणि अंगठी लंपास करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी कराडच्या विजय दिवस चौकात ही घटना घडली आहे.
कराड येथे तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाला गंडविले; चेन, अंगठी केली लंपास - तोतया पोलिस
दोन तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाला पोलीस असल्याचे सांगून सोन्याची चैन आणि अंगठी लंपास केली आहे. दोन्ही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त प्रा. विजय बंडोपंत कुलकर्णी (वय 63, रा. रूक्मिणी विहार, कराड) हे पत्नीसमवेत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी स्टेशन रोडने शिवाजी स्टेडियमकडे निघाले होते. फूटपाथवरून चालत असताना मोटरसायकलवरून आलेल्या एकाने हाक मारून त्यांना जवळ बोलावले. रात्री येथे चरस आणि गांजा सापडला असून आम्ही तपासणी करत असल्याचे त्यांनी कुलकर्णीला सांगितले. त्याचवेळी तेथे आलेल्या एकास त्याने अंगावरील दागिने आणि खिशातील पैसे काढून रूमालात बांधण्यास सांगितले. त्यानंतर त्याने कुलकर्णी यांनाही दागिने काढून रूमालात ठेवण्यास सांगितले. खिशातून बनावट ओळखपत्र दाखवून आपण फौजदार असल्याचे भासविले. त्यामुळे कुलकर्णी यांनी गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील अंगठी, मनगटातील चांदीचे कडे, हातातील घड्याळ रूमालात बांधून त्याच्याकडे दिले. काही वेळ त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने रूमालांची अदलाबदल केली. त्यातील गाठ मारलेला एक रूमाल कुलकर्णी यांना दिला. त्यानंतर दुसरा इसमही मोटरसायकलवर बसला आणि दोघे जण साईबाबा मंदिरमार्गे मोटरसायकलवरून निघून गेले. काही वेळाने कुलकर्णी यांनी गाठ मारलेला रूमाल सोडून पाहिला असता त्यात सोन्याची चेन आणि अंगठी नव्हती.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय कुलकर्णी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तसेच शिवाजी हायस्कूल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतला आहे.