कराड (सातारा) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असलेल्या पाटण तालुक्यातील मळे, कोळणे आणि पाथरपुंज या गावांचे पाटणसह कराड तालुक्यात लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटण तालुक्यातील बहुले, जाईचीवाडी आणि कराड तालुक्यातील हणबरवाडी, वराडे, हेळगाव, गोसावीवाडी येथील वन जमिनींची वन विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली.
वन्यजीव विभागाच्या हद्दीतील कोअर झोनमध्ये असलेले मळे, कोळणे व पाथरपुंज या गावांचे स्थलांतर होणार आहे. शासन निर्देशानुसार या गावांचा पुनर्वसन प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी सातारचे उप वनसंरक्षक भारतसिंह हाडा, कराडचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी कराड तालुक्यातील हणबरवाडी, वराडे, हेळगाव, गोसावीवाडी आणि पाटण तालुक्यातील बहुले, जाईचीवाडी (बोंद्री) येथील वनक्षेत्राची पाहणी केली. पुनर्वसनासाठी जागा योग्य आहे की अयोग्य, याची अधिकार्यांनी माहिती घेतली. पुनर्वसन करावयाच्या क्षेत्राची जीपीएस यंत्राद्वारे मोजणी केली. तसेच या क्षेत्राचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. गावठाण सोयी-सुविधांसाठी आणि शेतीसाठी किती क्षेत्र उपलब्ध होऊ शकते, याचाही अधिकार्यांनी आढावा घेतला.