साताऱ्यातील छत्रपती घराण्यातील शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित - VIJAYADASHAMI SIHLA
दरवर्षी होणारा राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. जलमंदीर पॅलेसच्या जनसंपर्क कार्यालयातून याबद्दल माहिती देण्यात आली.
सातारा : दरवर्षी होणारा राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. जलमंदीर पॅलेसच्या जनसंपर्क कार्यालयातून याबद्दल माहिती देण्यात आली. शिवप्रभु छत्रपतींच्या राजगादीची सीमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा तितक्याच तोलामोलाने राजघराण्याने पुढे चालु ठेवली आहे. हा शाही सीमोल्लंघन सोहळा सातारकर जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे. यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतून मिरवणुक काढण्यात येते.
जुन्या साताऱ्याची वेस असलेल्या पोवईनाका येथे सीमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते. पूजन झाल्यावर परत ही पालखी जलमंदिर पॅलेस येथे आल्यावर पूजा-अर्चा झाल्यावर राजघराण्यातील सर्व सदस्य समस्त सातारकरांच्या आपटयाच्या पानांचा स्वीकार करतात आणि त्यानंतर समस्त सातारकर नागरीक सोने लुटतात.
मात्र यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीत आज संध्याकाळी होणारा विजयादशमी शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.