सातारा -इन्स्टाग्रामवर एका युवतीने एअरफोर्समधील जवानाशी प्रथम ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याला हनी ट्रॅपमध्ये ( Honey Trap ) अडकवण्यात आले. हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या या जवानाकडून 64 हजार रूपयांची खंडणी उकळत त्याच्यावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ( Satara Crime Branch ) पुण्यातील एका युवतीसह चौघांना अटक केली आहे. निशू मीना (वय 21, रा. गुना- मध्य प्रदेश), रामकुमार आईदानराम बिष्णोई (वय 23), दिनेश मोहनलाल बिष्णोई (वय 20, रा. जोधपूर-राजस्थान), लक्ष्मीलाल सरदारजी मीना (रा. जि. उदयपूर-राजस्थान, हल्ली रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी हा मूळचा राजस्थानमधील आहे. तो पंजाब एअरफोर्समध्ये कार्यरत आहे.
सातारा रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले -एअरफोर्समधील जवानाशी पुण्यातील युवतीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि त्या युवतीने शनिवारी (दि. 2 जुलै) त्याला सातारा रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले. येथे आल्यानंतर युवतीने त्याला ओमनी कारमध्ये बसायला सांगितले. त्यावेळी कारमध्ये तीन जण होते. फिर्यादी गाडीत बसल्यानंतर आपला विनयभंग केल्याचा कांगावा युवतीने सुरू केला. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या फिर्यादीने 64 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, आणखी पैशासाठी आरोपी त्याच्याशी झटापट करू लागले. त्याने प्रतिकार करताच एका आरोपीने चाकूने त्याच्यावर दोन वार केले. तरीही तो प्रतिकार करू लागल्याने एकाने पिस्तुल दाखवले. त्याचवेळी संशयितांनी त्याच्या खिशातील 2500 रूपये आणि दोन्ही मोबाईल काढून घेतले.