महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'समाजभान जपत कोरोना सेंटरला केली मदत' - Corona Patan

पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी समाजभान जपत, आपला एक महिन्याचा पगार कोरोना सेंटरला मदत म्हणून दिला आहे. तसेच, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनीही या कामास आपला हातभार लावावा, असे आवाहनही तहसीलदार टोम्पे यांनी केले आहे.

तहसीलदार योगेश टोम्पे
तहसीलदार योगेश टोम्पे

By

Published : May 15, 2021, 7:28 PM IST

कराड - तालुक्यातील प्रशासन कोरोनाच्या परिस्थितीशी दोन हात करत आहे. महामारीच्या काळात रुग्णांच्या सुविधांसाठी समाजातील दान करू शकतात, अशा लोकांनी मदत करण्याची गरज होती. ही बाब लक्षात घेऊन, पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी स्वत:पासूनच मदतीची सुरूवात करत, आपला एक महिन्याचा पगार कोरोना सेंटरला मदत म्हणून दिला आहे.

समाजभान जपणारे तहसीलदार; एक महिन्याचा पगार दिला कोरोना सेंटरला


स्थानिक पातळीवर रूग्णांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी विलंब

कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. परंतु, स्थानिक पातळीवर रूग्णांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी थोडा विलंब होत आहे. यामध्ये औषधे, इंजेक्शन यासारख्या साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. परंतु, समाजात जे लोक मदत करू शकतात, अशा लोकांनी मदतीसाठी पुढे आल्यास, रूग्णांसाठी तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल. या पार्श्वभूमीवर पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. तसेच, त्यांनी स्वतःचा एक महिन्याचा पगार कोरोना सेंटरला दिला आहे. आपण स्वत:पासून सुरूवात केल्यामुळे इतरही त्याचे अनुकरण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढली

पाटण हा डोंगरी आणि दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. दर्‍या-खोर्‍यांत विखुरलेल्या पाटण तालुक्यात आरोग्य सुविधा विलंब न होता पोहचविण्याचे काम प्रशासनाला प्राधान्याने करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, कोरोनामुळे अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहेत. परंतु, योगेश टोम्पे यांच्यासारखा तरुण अधिकारी तहसीलदार म्हणून प्रशासकीय पातळीवर नेटाने काम करत आहे. प्रशासनातील इतर सहकारीही त्यांना साथ देत आहेत. आता त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेत, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनाही या कामासाठी सरसावल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे

लॉकडाऊनमध्ये नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रशासकीय प्रमुख म्हणून योगेश टोम्पे हे कार्यालयीन कामे करत, स्वत: ग्रामीण भागात फिरत आहेत. चेकपोस्ट, कोरोना विभागाला भेटी देणे, ऑक्सिजन सिलिंडरची तपासणी करणे, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणे, या जबाबदार्‍याही ते पार पाडत आहेत. पाटण तालुक्याच्या वाट्याला आलेले ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्यासाठी ते स्वत: सातार्‍यात रात्रभर थांबून होते. या प्रशासकीय जबाबदारीसह सामाजिक जबाबदारीही महत्वाची मानून, त्यांनी आपला एक पगार कोरोना लढ्यासाठी दिला आहे. आज सरकार, प्रशासन हे सर्व कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लढा देत आहेत. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी देखील मदतीचा हात देणे गरजेचे आहे. या कामाची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. आता सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनीही या कामास आपला हातभार लावावा, असे आवाहनही तहसीलदार योगेश टोम्पे यांनी केले आहे.

हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details