सातारा - जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या पावसात वीज पडून माण तालुक्यात दहा शेळ्या व एक बोकड ठार झाला. वाई तालुक्यात नारळाच्या झाडावर वीज पडून झाडे जळून गेली. अनेक ठिकाणी पाडाला आलेले आंबे झडुन गेले तर झाडे पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, वीज पडून दहा शेळ्या व एक बोकड ठार
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या पावसात वीज पडून माण तालुक्यात दहा शेळ्या व एक बोकड ठार झाला.
दोन लाखांचे नुकसान -
आज दुपारी सातारा, वाई, खटाव, माण, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, जावळी परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र मोठे नुकसान केले आहे. शिरताव (ता. माण) येथील माळ्याचा मळा या शिवारात आज पाऊणे चारच्या सुमारास वीज पडून दहा शेळ्या व एक बोकड ठार झाले. येथील शेतकरी दगडू नामदेव लुबाळ हे शिवारात शेळ्या राखत होते. अचानक विजेच्या कडकडाटसह पाऊसाला सुरुवात झाली म्हणून ते जवळच निवाऱ्याला गेले. अचानक विजेचा कडकडाट होऊन शेळ्याच्या अंगावर वीज पडल्याने दहा शेळ्या व एक बोकड ठार झाले. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान -
शेलरवाडी (ता. वाई) येथे नारळांच्या झाडांवर वीज पडल्याने नारळाची झाडे जळून गेली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उतरणीला आलेल्या झाडावरील पाडाचे आंबे झडून गेल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे वीज पडल्याने व वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. मात्र जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.