महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच; महामार्गावरही साचले पाणी - महाबळेश्वर-तापाेळा रस्त्यावर दरड काेसळली

मागील काही दिवसांपासून साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

रस्त्यावर दरड काेसळली
रस्त्यावर दरड काेसळली

By

Published : Jun 18, 2021, 9:23 AM IST

सातारा: जिल्ह्यात काल (गुरुवार) दिवसभरापासून सरासरी एकूण 46.8 मि.मी.पाऊस पडला आहे. तर आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे केळघर घाटत दरड काेसळली. त्यामुळे महाबळेश्वरला जाणारी वाहतुक धिम्या गतीने सुरु हाेती. याबराेबरच महाबळेश्वर-तापाेळा रस्त्यावर दरड काेसळल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. सातारा-कास रस्त्यावरही रस्त्यावर दरड कोसळली आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

महामार्गावर साचले पाणी

मागील काही दिवसांपासून साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावरही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. संततधार पावसाने महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा-कास रस्त्यावर काल (गुरुवार) दुपारी अचानक दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आले. या रस्त्यावर नियमितपणे वर्दळ असते, मात्र दगड रस्त्यावर येत असताना कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच कास परिसरातील प्रसिद्ध असलेल्या एकीव धबधब्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर आले.

खटाव तालुक्यातही पावसाची हजेरी

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर वाघेरा (महाबळेश्वर) या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली. स्थानिकांनी दगड, माती हलवून रस्ता पूर्ववत केला. मायणी भागात पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. जावळी तालुका परिसरात रात्री पासून संततधार पाऊस पडत आहे. खटाव तालुक्यात गुरुवार पहाटे पासून पावसाने हजेरी लावली असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी- वाई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रात्रीही मुसळधार पाऊस कोसळत आहे.

पुढील ४८ तासातमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय माहिती

कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये
- सातारा - 40 (146.6)
- जावळी - 80.1 (230.9)
- पाटण - 82.3 (170.3)
- कराड - 98.9 (203.7)
- कोरेगाव - 20.4 (104.4)
- खटाव - 15.1 (78.0)
- माण - 4.6 (57.2)
- फलटण - 2.8 (64.1)
- खंडाळा - 6.8 (77.5)
- वाई -18.7 (128.4)
- महाबळेश्वर - 143 (389)

हेही वाचा -कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्ग जलमय, वाहतूक विस्कळीत

ABOUT THE AUTHOR

...view details