कराड (सातारा)- महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेश राज्यासाठी वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी (दि. 11 जून) दमदार पाऊस झाला असून पाण्याची आवकही सुरू झाली आहे. या वर्षातील पहिल्याच दिवशी कोयना धरणात प्रति सेकंद 1 हजार 282 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा आणि मान्सूनचे आगमन याचा परिणाम म्हणून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. चोवीस तासात कोयनानगर येथे 29 तर महाबळेश्वर येथे 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सध्या कोयना धरणातील पाणी पातळी 2 हजार 73 फूट इतकी झाली आहे. तसेच धरणात प्रति सेकंद 1 हजार 282 क्युसेक पाण्याची आवकही सुरू झाली आहे. कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षातील ही पहिलीच आवक आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा 28.19 टीएमसी इतका झाला आहे.