कराड (सातारा) - पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी उद्या (मंगळवारी) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
कृष्णा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहकार मंत्री पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी टोपे हे सोमवारी कृष्णा रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.
'कोरोनाची लागण झालेल्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना उद्या मुंबईला हलविणार' यावेळी बोलताना ते म्हणाले, की पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दि. १४ ऑगस्टला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तीन दिवस उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला न्यावे, असा निर्णय सर्वानुमते झाला आहे. त्यानुसार बाळासाहेब पाटील यांना मंगळवारी दुपारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
रविवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब पाटील यांची प्रकृतीची विचारपूस केली, तर सोमवारी सकाळी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही कृष्णा रुग्णालयात येऊन बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.