सातारा -कोयना धरणाच्या ( Koyna Dam ) पाणीसाठ्याने अर्धशतकी टप्पा पार केल्याने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला ( Maharashtra Industrial sector ) मोठा दिलासा मिळाला आहे. चोवीस तासात धरणात 5.10 टीएमसी इतकी आवक झाली आहे. यंदाच्या तांत्रिक वर्षात एका दिवसातील ही विक्रमी आवक ( Record Break Incoming ) आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीच धरणातील पाणीसाठ्याने ( Water reservoirs )पन्नाशी गाठली होती. सकाळी 8 पर्यंत पाणीसाठा 52.15 टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे.
पश्चिमेकडे पावसाची संततधार, पुर्वेकडे उघडझाप -सातारा जिल्ह्याचा ( Satara District ) पश्चिम भाग अतिपावसाचा असल्याने कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ( Koyna Dam Catchment area ) पावसाची संततधार कायम आहे. मात्र, पुर्वेकडील भागात पावसाची उघडझाप पाहायला मिळत आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगावसह कराड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची सरासरी कमी आहे. पश्चिम भागातील महाबळेश्वर, वाई, कोयनानगर, नवजा, वाळवण या भागात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक वाढत आहे.
कोयना धरणात प्रतिसेकंद 61 हजार क्युसेक पाण्याची आवक -धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 61,108 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे धरणाची पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी सध्या 2109 फूट 8 इंच झाली आहे. वाढणारी पाणी पातळी आणि शिल्लक असलेला पाऊसकाळ पाहता धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्ग कायम ठेऊन पाणी पातळी नियंत्रित केली जात आहे.